पुण्यातील बुद्धिबळ महागुरू जोसेफ सरांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!!

जोसेफ डिसौझा, भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील एक नामांकित आणि आदरणीय व्यक्तिमत्व !

साधारण 90चे दशक, ज्या काळात भारतात खेळाला किंवा खेळाडूंना काहीच महत्व नव्हते त्या काळात एखादया खेळाचे प्रशिक्षण कार्य हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारणे हि विशेष गोष्ट होती. त्या वेळी पूर्णवेळ क्रीडा प्रशिक्षक हे फक्त क्रिकेट मध्येच दिसायचे. बाकीच्या खेळांमध्ये असे प्रशिक्षक सापडणे अत्यंत दुर्मिळ म्हटले तरी चालेल.

त्या वेळी पुण्यामध्ये मोहन फडके सर हे फक्त बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून लोकांना माहीत होते. पण फडके सर देखील नोकरी सांभाळूनच हे सर्व करत असत.
जोसेफ डिसौझा सरांनी पूर्णवेळ बुद्धिबळ प्रशिक्षक हा व्यवसाय स्वीकारला आणि आज 28 वर्षांनी देखील ते प्रशिक्षकाच्या भूमिकेत यशस्वी पणे काम करत आहेत ! या दृष्टीने जोसेफ सरांना पुण्यातील आद्य बुद्धिबळ प्रशिक्षक निश्चितच म्हणता येईल. आता पर्यंत त्यांनी शब्दश: हजारो खेळाडू निश्चितच तयार केले आहेत.

जयंत-चंद्रशेखर हे गोखले बंधू आणि अभिजित - मृणालिनी कुंटे यांच्या समकालीन काहीजण सोडले तर नंतर चे जवळपास सर्वच प्रथितयश खेळाडू अगदी GM अक्षयराज कोरे व दिव्यांग विश्वविजेता शशिकांत कुतवळसह सर्वच जण हे कधी ना कधी जोसेफ सरांकडे बुद्धिबळ शिकायला गेले होते असे म्हटले तर यात अजिबात अतिशयोक्ती नाही.

आज पुण्यात 500 पेक्षा जास्त बुद्धिबळ प्रशिक्षक निश्चितच असतील. यातील नक्की संख्या माहित नसली तरी किमान 100 पेक्षा जास्त जण तरी पूर्णवेळ बुद्धिबळ प्रशिक्षक निश्चितच असावेत. या सर्व प्रशिक्षकांचे प्रेरणास्रोत जोसेफ सर आहेत यात शंका नाही.

बुद्धिबळात 2200 रेटिंग असलेल्यांना कॅण्डीडेट मास्टर (CM)या पदवीने संबोधले जाते. जोसेफ सर हे कॅण्डीडेट मास्टर आहेत. आजच्या घडीला जगातील सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू भारतात आहेत. त्यातील 350 ते 400 च्या आसपास खेळाडू हे पुण्यात असतील. मात्र आजही पुण्यात 2200 च्या वर आंतरराष्ट्रीय मानांकन असलेले केवळ 25-30 खेळाडूच आहेत. यांच्यात जोसेफ सरांचा समावेश आहे हि बाब खेळाडू म्हणून त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यास पुरेशी आहे.

खेळाडू, प्रशिक्षक या बरोबरीने एक संयोजक म्हणून देखील ते अत्यंत यशस्वी ठरले आहेत. आज प्रत्येक खेळाच्या क्रीडा संघटनेत संघटना कोण ताब्यात ठेवणार या वरून हमरी तुमरी चालू असलेली दिसून येईल. बुद्धिबळ क्षेत्र देखील त्यास अपवाद नाही, पण जोसेफ सरांनी पुणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन चा कारभार ज्या काळात हातात घेतला तेंव्हा असलेल्या खेळांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे संघटनेचे सभासद व्हायला देखील खेळाडू व पालक तयार नसत. तेंव्हा पासून पुणे जिल्ह्यातील बुद्धिबळ प्रसारात जोसेफ सरांचे महत्वाचे योगदान राहिले आहे.

आज सुद्धा कुठलीही स्पर्धा आयोजित करताना कोणी प्रायोजक मिळवण्यापासून तयारी करावी लागते. जिल्हा संघटनेत काम करताना विविध स्तराच्या ठराविक स्पर्धा वर्षातून एकदा घेणे हे बंधनकारक असते. अशावेळी काय मेहनत घ्यावी लागते याची कल्पनाच केलेली बरी. अशा स्पर्धा वर्षानुवर्षे अखंडपणे घेण्याचे काम त्यांनी लीलया पेलले आहे.

कॅटेगरी 16 या श्रेणीची एकमात्र स्पर्धा भारतात आणि तो देखील पुण्यात यशस्वीपणे घेण्याचा विक्रम त्यांच्या व पुणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या नावावर अगदी अलीकडे पर्यंत होता.

सध्या पुणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन चे कार्याध्यक्ष असलेल्या जोसेफ सरांचे बुद्धिबळ खेळाच्या प्रचार आणि प्रसारातील कार्य हे निश्चितच प्रेरणादाई आहे.
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कार जोसेफ सरांना मिळाल्याबद्दल त्यांचे समस्त बुद्धिबळ क्षेत्रातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

केतन खैरे,पुणे.